*अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व एनिमल्स प्रदर्शनाचे उद्घाटन*
बेळगाव- “कर्नाटकाच्या विविध भागात अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करून बेळगावात आलेल्या सायमन एक्झिब्युटर्स यांचे हे प्रदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. तणावग्रस्त जीवनामध्ये माणसाला आनंदात वेळ घालवण्यासाठी अशा प्रकारची प्रदर्शने उपयोगी ठरतात समस्त बेळगावकर या प्रदर्शनाचे निश्चित स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो” असे उद्गार बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रोटरीचे माजी गव्हर्नर श्री अविनाश पोतदार यांनी बोलताना व्यक्त केले.
सीपीएड मैदानावर सुरू करण्यात आलेल्या अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व ऍनिमल प्रदर्शनाचे उद्घाटन श्री अविनाश पोतदार यांच्या हस्ते फीत सोडून सोमवारी सायंकाळी करण्यात आले. याप्रसंगी मुरकुंबी शुगरच्या विद्या मूरकुंबी याही उपस्थित होत्या .
सायमन एक्झिब्युटर्सचे संचालक नागचंद्रा यांनी श्री पोतदार यांचे पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह आणि भेट वस्तू देऊन स्वागत केले. आणि कर्नाटकाच्या विविध शहरात आजवर अशी प्रदर्शने आम्ही आयोजित केली असून बेळगाव येथील हे पहिलेच प्रदर्शन आहे. ज्या प्रदर्शनात फुलपाखरांचे आणि प्राण्यांचे भव्य दिव्य असे खेळ आयोजित करण्यात आले असून, कर्नाटक राज्याची स्थापना होऊन पन्नास वर्षे झाली त्याचे औचित्य साधून आम्ही राज्यभरात “कर्नाटका संभ्रम 50” हे प्रदर्शन आयोजित करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आजवर झालेल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची, कर्नाटकातील सिने कलाकारांची ,कर्नाटकातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची तसेच क्रिकेट खेळाडूंची छायाचित्रे वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत. कर्नाटका संभ्रमाची सुरुवात आम्ही बेळगावतूनच करीत आहोत अशी माहितीही श्री नागचंद्रा यांनी दिली.
प्रदर्शनातील मांडणीची पाहणी करून अविनाश पोतदार व विद्या मूरकुंबी यांनी समाधान व्यक्त केले .रोटरी क्लब वेगवेगळी प्रदर्शने भरवितात त्याला बेळगावकर नेहमीच चांगले सहकार्य करतात असेही ते म्हणाले.
या प्रदर्शनात रोबोटिक बटरफ्लाय शो होत असून ते बेळगावकरांचे खास आकर्षण ठरेल. याचबरोबर रोबोटिक ॲनिमल किंग्डम पार्क, सिंगापूर टॉवर्स आणि सेल्फी पार्क ही या अम्युजमेंट पार्कची विशेष आकर्षण राहणार आहेत. अनेक स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनात ग्राहक उपयोगी वस्तू, फॅन्सी टॉईज व जेवणाचे स्टॉल्स राहणार असून प्रख्यात कंपनीची लेदर प्रॉडक्ट्स व हँडवर्क प्रॉडक्टस उपलब्ध राहणार आहेत. बच्चे कंपनीचे मनोरंजन करणारे अनेक गेम्स हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट राहील.
शिमोगा, म्हैसूर, बेंगलोर, दावणगिरी, मंगलोर अशा कर्नाटकातील विविध शहरात यशस्वीरित्या आयोजित करून हे प्रदर्शन सायमन एक्जीबिशनच्या वतीने आता बेळगावात सुरू केले आहे. रोज सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ पर्यंत हे अम्युजमेंट पार्क सीपीएड मैदानावर पुढील दीड महिना चालू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. सायमन एक्झिब्युटर्सचे गणेश रेड्डी यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी आनंद अॅड्स चे अनंत लाड, यश कम्युनिकेशनचे प्रकाश कालकुंद्रीकर व अनेक निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.