वीजबिल थकीत राहिल्यामुळे हेस्कॉमने कठोर पाऊल या सरकारी कार्यालयातील वीजच कापली
वीजबिल थकीत राहिल्यामुळे हेस्कॉमने कठोर पाऊल उचलत बेळगाव सब-रजिस्ट्रार कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कार्यालयात वीज नसल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सब-रजिस्ट्रार कार्यालयाकडे तब्बल २ लाख ३१ हजार ५११ रुपयांची वीजबिल थकबाकी होती. ही रक्कम वेळेत न भरल्याने हेस्कॉमने वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला.
वीज नसल्यामुळे ऑनलाईन सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. दस्तनोंदणी, नोंद प्रमाणपत्रे, तसेच इतर शासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांचा कार्यालयात मोठा खोळंबा झाला. अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, “सरकारी कार्यालयाच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने थकबाकी भरून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा प्रकार बेळगाव सब-रजिस्ट्रार कार्यालयातील प्रशासकीय हलगर्जीपणाचे जिवंत उदाहरण असल्याची चर्चा शहरात सुरू आहे

