प्रदूषित शहरांच्या यादीत बेळगाव सहाव्या स्थानी
बेळगाव ः दिवाळीच्या काळात हवेच्या प्रदूषणात नेहमी वाढ होत असते. दिल्ली, मुंबई यासारख्या मेट्रो शहरांत हवेच्या गुणवत्तेबाबत (एक्यूआय) सातत्याने चिंता व्यक्त केली जात असताना आता गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ख्याती असलेले बेळगावही राज्यातील प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.या यादीत कर्नाटकात बेळगाव सहाव्या स्थानी आहे. हावेरी शहर पहिल्या स्थानी आहे.
राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वात प्रदूषित दहा शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये हावेरी शहराचा पहिला क्रमांक असून तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 98 इतका आहे. या यादीत बेळगाव शेजारील जुळी शहरे असलेल्या हुबळीचा तिसरा आणि धारवाडचा पाचवा क्रमांक आहे. या दोन्ही शहरांतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 86 आणि 77 इतका आहे. बेळगाव सहाव्या स्थानी आहे. बेळगावच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 76 इतका आहे. धारवाड आणि बेळगावमध्ये केवळ एका अंकाचा फरक आहे.

