विठू नामाच्या गजरात आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी
बेळगाव शहर परिसरातील अनेक विठ्ठल मंदिरात भक्तांची मंदियाळी
बेळगाव शहर परिसरात आज आषाढी एकादशी मोठ्या भक्तीभावाने साजरी होत आहे. आषाढी एकादशी निमित्त परिसरातील विविध श्री विठ्ठल -रखुमाई मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच अनेक धार्मिक कार्यक्रम तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आषाढी एकादशी निमित्ताने वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरासह शहरातील शहापूर श्री नामदेव दैवकी विठ्ठल मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, विठ्ठलदेव गल्ली शहापूर , खडेबाजार बेळगाव येथील श्री विठ्ठल देव मंदिर अशा विविध ठिकाणच्या श्री विठ्ठल -रखुमाई यांची मंदिरे विद्युत रोषणाईने आकर्षकरीत्या सजावट करण्याबरोबरच, रंगबेरंगी फुलांच्या हरांनी आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे.
मंदिरांमध्ये पहाटेपासून काकड आरती, अभिषेक, महापूजा असे धार्मिक विधी सुरू आहेत. यापैकी कांही मंदिरांत पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान भजनी मंडळांचा सहभाग, हरिनामाचा गजर आणि टाळ मृदंगाची साथ यामुळे मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. प्रसंगी भक्तीभावात अनेक भाविकांची मंदियाळी यावेळी दिसून आली.