मृणाल हेबाळकर,प्रियांका जारकीहोळी,अंजली निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर
काँग्रेस पक्षाच्या वतीने आज गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुक उमेदवारांच्या यादीत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांना बेळगाव लोकसभा तर मंत्री सतीश जरकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांना चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ तसेच माजी आमदार अंजली निंबाळकर यांना कारवार मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आधीपासूनच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल यांचे नाव आघाडीवर होते. चिकोडीत मंत्री सतीश जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका तसेच चिकोडी काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अखेरीस प्रियांका यांचे नाव निश्चित करण्यात आले. चिंगळे यांना बेळगाव नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले.
त्याचप्रमाणे कारवारमधून डॉ. निंबाळकर यांनी प्रयत्न सुरू केले होते. आमदार असताना त्यांनी केलेली कामे व वर्चस्वाच्या आधारावर त्यांना उमेदवारी देण्यात आली. काही मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्यानावांवर तीन दिवसांआधीच शिक्कामोर्तब झाले होते.
केवळ औपचारिकता राहिली होती.
काँग्रेसने पहिल्या यादीत कर्नाटकातील सात उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्या यादीत १७ उमेदवार जाहीर केले. तिसरी यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. आता केवळ चार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.